ICC ODI World Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh : विश्वचषकाचा 38वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सोमवारी(दि.6 नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना श्रीलंकेसाठी करा वा मरो असा असेल. त्याचबरोबर बांगलादेश संघाला विजयासह दोन गुण मिळवायचे आहेत. श्रीलंका सात सामन्यांतून दोन विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बांगलादेश सात सामन्यांत एका विजयांसह नवव्या स्थानावर आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावर पावसाचं किंवा वारा-वादळाचं सावट नसले तरी दिल्लीतील प्रदूषणामुळे खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. वायुप्रदूषणामुळे सोमवारी होणाऱ्या सामन्यावर साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाते की नाही हे पाहायचे आहे.
विषारी धुक्याच्या जाड थराने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीला वेढले आहे, ज्यामुळे दोन्ही संघांना त्यांचे सराव सत्र एकदा तरी रद्द करावे लागले. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) गंभीर श्रेणीत आहे.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब …
गुरुवारपासून (2 नोव्हेंबर) AQI 400 च्या वर राहिला आहे. हवेची गुणवत्ता पूर्व चेतावणी प्रणालीनुसार, मंगळवारपर्यंत ती तीव्र राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, रविवारी सकाळी AQI 457 होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सामन्याच्या दिवशीच सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. सोमवारी सामना अधिकारी हवेची गुणवत्ता तपासतील.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
खेळण्याच्या स्थितीबाबत ICC च्या कलम 2.8 नुसार, “जर कोणत्याही क्षणी पंचानी मान्य केले की, “मैदान हे हवामान किंवा प्रकाश किंवा इतर कोणतीही परिस्थितीत धोकादायक किंवा अयोग्य आहे, तर ते लगेचच खेळ स्थगित करतील किंवा खेळ सुरू करण्यास परवानगी देणार नाहीत.”
लंकेचे खेळाडू 2017 मध्ये मास्क घालून उतरले होते मैदानात…
श्रीलंकेला दिल्लीच्या वायू प्रदूषणाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी 2017 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूंना मास्क घालावे लागले होते आणि काही खेळाडूंना सामन्यादरम्यान उलट्याही झाल्या होत्या.
बांगलादेश संघाचे संचालकानी केला खुलासा..
शुक्रवारी बांगलादेश संघाचे संचालक खालिद महमूद यांनी खुलासा केला की, अनेक क्रिकेटपटूंना खोकल्याची तक्रार आहे. शहरात फिरण्यासाठी बाहेर निघाल्यानंतर संघाच्या व्यवस्थापनाला पहिले सराव सत्र रद्द करावे लागले होते. त्यादिवशी हवेची गुणवत्ता आणखी खराब होऊन “गंभीर” श्रेणीत पोहोचली होती.
#CWC2023 #INDvSA : अखेर प्रतीक्षा संपली, वाढदिवशी विराटनं केली सचिनच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी…
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे …
बांगलादेश : शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), तनजीद हसन तमीम, नझमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तौहीद हसन. अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), कुसल परेरा, पथुम निसांका, दुष्मंथा चमीरा, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महिष तिक्षना, दुनिथ वेलालागे, कसून राजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने.