Pakistan VS Nepal, Asia Cup 2023 1st Match : पाकिस्तानने आशिया कप 2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्यांनी नेपाळचा 238 धावांनी पराभव केला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध 2 सप्टेंबरला तर नेपाळचा पुढील सामना भारताविरुद्ध 4 सप्टेंबरला असेल.
या विजयााासह पाकिस्तानने नवा इतिहास रचला आहे. घरच्या मैदानावर रन्सच्या बाबतीत पाकिस्तानचा वनडे फॉरमॅटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने तब्बल 18 वर्षांपूर्वी कराची वनडेत इंग्लंडचा 165 रन्सच्या फरकाने पराभव केला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 6 गडी गमावून 342 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 23.4 षटकांत 104 धावांवर गारद झाला.नेपाळकडून सोमपाल कामीने 28, आरिफ शेखने 26 आणि गुलशन झाने 13 रन्स केले. याशिवाय एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
पाकिस्तानकडून शादाबने चार विकेट घेतल्या. तर शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी,कर्णधार बाबर आझमची दीडशतकी खेळी व ईफ्तेकार अहमदची नाबाद वादळी शतकी खेळी यांच्या जोरावर यजमान पाकिस्तानने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात दुबळ्या नेपाळसमोर विजयासाठी 343 धावांचे आव्हान ठेवले होते.
कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत फलंदाजीला अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फखर झमान व इमाम उल हक यांनी साफ निराशा केली. हे दोघे बाद झाले तेव्हा त्यांच्या 2 बाद 25 धावा झाल्या होत्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने महंमद रिझवानच्या साथीत डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले.
रिझवान चांगला खेळत असताना 44 धावांवर परतला. त्याचे अर्धशतक हुकले मात्र, त्याने बाबरला सुरेख साथ दिली. या खेळीत त्याने 50 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार फटकावले. यानंतर फलंदाजीला आलेल्या आगा सलमाननेही निराशा केली. मात्र, त्यानंतर इफ्तेकारने बाबरच्या साथीत आक्रमक फलंदाजी केली. बाबरने अर्धशतकी पल्ला पार केल्यावर धावांचा वेग वाढवला व 45 व्या षटकापूर्वीच शतकी मजल मारली.
दरम्यान इफ्तेकारनेही अर्धशतक पूर्ण करत शतकाकडे कूच केली. या जोडीने शतकी भागीदारी करत संघाचे द्विशतक तसेच लगोलग त्रिशतकही फलकावर लावले. या जोडीने पाकिस्तानसाठी चौथ्या गड्यासाठी 214 धावांची विक्रमी भागीदारी केली.
यावेळी बाबर दीडशतकी खेळी करुन बाद झाला. त्याने 151 धावांच्या या खेळीत 131 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार व 4 षटकार फटकावले. इफ्तेकारने वादळी फलंदाजी करत शतक साकार करताना शादाब खानसह संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. शादाब 4 धावांवर नाबाद राहिला तर, इफ्तेकारने नाबाद 109 धावांची खेळी केली. त्यात त्याने 71 चेंडूत 11 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
नेपाळकडून सोमपाल कामी याने सर्वाधिक 2 गडी बाद केले. के. सी. करण व संदीप लमिछाने यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.