अहमदाबाद – कसोटी क्रिकेटची क्रुर थट्टा ठरावी असा सामना गुरूवारी येथे संपला. पाच दिवसांच्या या सामन्याचा केवळ दोनच दिवसांत निकाल लागला. निचांकी धावसंख्येच्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला व चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयाच्या जोरावर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा आपला दावा आणखी भक्कम केला.
दरम्यान, रवीचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 व्या बळींची नोंद केली. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विनने हा पल्ला गाठला. 400 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा जगातील 17 वा तर, भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी कपील देव, अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी ही कामगिरी केली आहे. 2011 साली कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने 77 व्या कसोटी सामन्यात 400 बळींचा टप्पा पार केला आहे.