विरोधी पक्षनेत्यांनी आधी काम करावे, मग बोलावे
सातारा – कोविड19 लसीकरणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, म्हणून मी साताऱ्याच्या पश्चिम भागात फलक लावले. त्यामुळे तुम्हाला पोटशूळ उठला आहे. त्याला पोस्टरबाजी म्हणत असाल, तर तुम्ही नैराश्यात असल्याचे स्पष्ट आहे.
करोना काळात तुम्ही घरात लपून बसला होता. तेव्हा मी लोकांना मदत करत होतो. त्याची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली. तुम्ही चमकोगिरी थांबवून विरोधी पक्षनेते असल्यासारखे वागावे, असा टोला माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांना लगावला.
करोना व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरून मोने यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेला राजेशिर्के यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. त्यात म्हटले आहे की, तुम्ही विरोधी पक्षनेते असूनही करोना काळात पालिकेत फिरकलाही नव्हता. या काळात लोकांना कोण मदत करत होते, याची माहिती घ्या.
आगाऊ ऑनलाइन नावनोंदणीमुळे लोकांना लस लवकर मिळत नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना भेटून मी ऑन दी स्पॉट’ नोंदणी व लसीकरणाची मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना भेटून डेंग्यूबाबत जनजागृती मोहीम प्रथम मी सुरू केली. त्याचे पुरावे हवे असतील, तर ते देतो.