आमदार अशोकबापू पवार हे गेल्या 25 वर्षांपासून राजकीय जीवनात वावरत आहेत. राजकीय जीवनात वावरत असताना अनेक चढउतार आले. पण ते मागे कधी हटले नाहीत. राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं; पण संघर्ष मात्र चुकला नाही. 25 वर्षांत कुटुंबासाठी त्यांना म्हणावा असा वेळ देता आला नाही. जनतेच्या सेवेत त्यांनी स्वतःला अक्षरशः वाहून घेतलं.
शिरूर पंचायत समितीची पहिली राजकीय निवडणूक बापूंनी लढवली आणि तिथून पुढेच त्यांचा खरा खडतर राजकीय प्रवास सुरू झाला. तालुक्याच्या राजकारणात त्यांनी डोकावलं. जनतेच्या सुख-दुःखात ते सहभागी होऊ लागले. अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर अभ्यास करू लागले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्नं पाहू लागले. उच्चशिक्षित, कायद्याचे, शेतीचे अभ्यासक असल्यामुळे तालुक्याची नाळ ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. 2009 ला शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. सर्वांगीण विकासाचं पाहिलेलं स्वप्नं त्यांनी सत्यात उतरावयला सुरुवात केली. पाच वर्षांत त्यांनी अभिनव आणि भरीव अशा विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. शेती, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, सुरक्षा यावर प्रामुख्यानं भर दिला. राज्याला नावीन्यपूर्ण योजना दिल्या. मतदारसंघाचा विकास गतिमान आणि गतिशील चालला होता. पण 2014 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आणि मतदारसंघाच्या विकासाला खीळ बसली. पण त्यांची नाळ ही खुर्चीशी नसून जनतेची असल्यामुळे ते लोकांपासून दूर गेले नाहीत. 2019च्या निवडणुकीत जनतेनं त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. विक्रमी मताधिक्यानं ते आमदार झाले. करोना आणि पूरपरस्थितीत त्यांनी राज्यात एक नंबरचं काम करून दाखवलं.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील नदीच्या तीरावर वसलेले एक आदर्श गाव म्हणजे शिरसगाव काटा जुना वारसा लाभलेले गाव त्याचप्रमाणे कोरडवाहू गाव म्हणूनही गाव प्रसिद्ध होतं. परंतु कै. रावसाहेब दादा पवार यांनी घोड धरणावरून ऐतिहासिक उजवा कालवा शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात आणला आणि तालुक्याच्या पूर्व भागाचे संपूर्ण रूपच पालटून गेले. अशा आमच्या गावा वरती कै.रावसाहेबदादांचा नेहमीच पगडा राहिलेला आहे. कै.रावसाहेबदादांचा हाच वारसा कार्यसम्राट आमदार अशोकबापूंनी पुढे चालू ठेवलेला आहे. माझे वडील कै. आण्णासाहेब नारायण माने यांनी 1964 साली गावांमध्ये विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना करून सहकार चळवळीला कै. रावसाहेबदादांना मोलाची अशीच साथ दिली. तोच वारसा पुढे चालू ठेवत अशोकबापूंच्या पहिल्या पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण कुटुंबाचे संबंध अधिक दृढ झाले.
शब्दांकन ः प्रमोल कुसेकर, मांडवगण फराटा
नरेंद्र माने
संचालक रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे