मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संबंधात भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत महिला आयोगाने मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. शेलारांचे नेमके वक्तव्य काय होते याबाबत माहिती देण्याची सूचना त्यांना आयोगाने केली आहे.
या संबंधात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोणत्याही जबाबदार राजकीय नेत्याने महिलांच्या विरोधात बदनामीकारक किंवा अवमानकारक वक्तव्य करणे सहन केले जाणार नाही. त्यामुळे आम्ही मुंबई पोलिसांकडून शेलार यांच्या वक्तव्याविषयीचा अहवाल मागवला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
वरळी गॅस स्फोट प्रकरणातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मुंबईच्या महापौरांना 72 तासांनंतर वेळ मिळाला होता, एवढा काळ त्या कोठे झोपल्या होत्या असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता. एका महिलेला उद्देशून अशा भाषेचा प्रयोग आक्षेपार्ह असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षांचे मत आहे.