पिंपरी – एका शेळी चारणाऱ्याने सिगारेट पिण्यासाठी पेटविलेली काडी तशीच खाली गवतावर टाकली. यामुळे सांगवी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजता नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर घडली.
बंडू पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक विनायक विठ्ठल डोळस यांनी बुधवारी (दि. 6) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने जागेच्या अभावामुळे नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात लावली जातात. या मैदानावर आरोपी बंडू पवार हा शेळ्या चारण्यासाठी आला होता. त्याने सिगारेट पिताना पेटविलेली काडी तशीच जमिनीवर टाकली. या पेटत्या काडीमुळे वाळलेल्या गवताने पेट घेतला आणि जवळपास 40 हून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाली. या आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.