पिंपरी – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप अथवा विक्री करण्यासाठी महापालिकेचा परवाना असणे अनिवार्य आहे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन अनुक्रमे 21 जून आणि 22 जून रोजी महापालिका कार्यक्षेत्रात होणार आहे. त्या अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप करण्यासाठी दुकान किंवा स्टॉल सुरू करण्यासाठी तात्पुरता परवाना देण्यात येणार आहे. हा परवाना ऑनलाइन काढता येणार असून यासाठी नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर दुकानासाठी तात्पुरता परवाना या लिंकवर फॉर्म भरून परवानगी घेणे आवश्यक आहे.
यात वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, दुकान किंवा स्टॉल ज्या ठिकाणी उभारायचा आहे तेथील पत्ता, जवळची खूण, दुकान वैयक्तिक स्तरावर अथवा संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दुकान किंवा स्टॉल उभा करायचा आहे, तेथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील हा परवाना घेता येणार आहे. ही परवानगी घेण्याबाबत काही अडचण उद्भवल्यास कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड (9922501763) यांच्याशी संपर्क साधावा.