जामखेड – जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयूर (अर्थव) महादेव (मिनेश) हजारे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. मुलाचे वडील महादेव (मिनेश) हजारे हे जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असून, ते सध्या कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरी करीत आहेत. त्यांचा मुलगा मयूर (अर्थव) हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता.
काल (दि. 17) रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात मयूर यास 60 % गुण मिळाले. यामुळे त्यास नैराश्य आले. घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज देवदैठण येथे सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयूर हा जामखेड येथील साईबन मंगल कार्यालय तसेच साई फोटो लॅबचे मालक संजय हजारे यांचा पुतण्या होता. कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.