देहूगाव – जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी 337 वा पालखी सोहळा सोमवारी (दि.20) प्रस्थान ठेवणार असून मंगळवारी (दि.21) पंढरपुरकड़े मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था भाविकांना विविध सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहेत. वाहतूक कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सुमारे 700 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात क़रण्यात आला आहे.
गेली दोन वर्षांपासून पालखी सोहळा कोरोना संकटावर मोजक्याच लोकांमध्ये पार पडला होता. यंदा या सोहळ्यासाठी राज्याच्या काना-कोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या नेहमी होणाऱ्या गर्दी पेक्षा 25 टक्के जास्त होणार असल्याचा ामदाज वर्तविण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिंड्यांसह भाविकांचे आगमन सुरु झाले आहे. मुख्य मंदीरात 36 ,वैकुंठस्थान मंदीरात 10 सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. आळंदी येथील स्वकाम सेवा संस्थेचे , अनिरूद्ध बापू संस्थेचे,खासगी सुरक्षारक्षक विविध सेवा पुरविणार आहे. प्रदूषण मुक्त पर्यावरण राखण्यासाठी झाडे लावा,झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा निर्मल वारीसाठी स्वच्छता राखा कसा जनजागृती संदेश देण्यात येणार असल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन गोपाळ मोरे, पालखी सोहळा प्रमुख हभप संतोष नारायण मोरे,हभप विशाल केशव मोरे, हभप माणिक गोविंद मोरे,विश्वस्त हभप संजय दामोदर मोरे,हभप भानुदास अंकुश मोरे ,हभप अजित लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे. सोहळयातील पालखी प्रस्थानचे धार्मिक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम
पहाटे 5 वा. श्री ची ,संत तुकाराम शीळा मंदीर, श्री विठ्ठल-रखूमाई महापुजा, पहाटे 6 वा. वैकुंठस्थान श्री संत तुकाराम महाराज पूजा, सकाळी 7.वा तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा- संस्थानचे अध्यक्ष,विश्वस्त,वंशज, वारकरी यांच्या हस्ते,
सकाळी 10.30 पालखी प्रस्थान वैकुंठस्थान संत तुकाराम महाराज मंदीराकडे, सकाळी 10 ते 12 . रामदास महाराज मोरे यांचे (देहूकर) पालखी प्रस्थान सोहळा काला किर्तन
स. 9 ते 11 . श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन, इनामदार वाडा.
दु. 2.30 वा. पालखी प्रस्थान सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत.
सायं. 5 वा. पालखी प्रदीक्षणा
सायं 6.30 वा .पालखी सोहळा मुक्काम , इनामदार वाडा. मुख्य आरती.
रात्री 9 वा कीर्तन, जागर
या सोहळ्याकरिता 3 सहाय्यक पोलीस आयुक्त 8 पोलीस निरीक्षक ,25 पोलिस अधिकारी यासह 345 पोलिस कर्मचारी,महिला पोलिस कर्मचारीसह याव्यतिरिक्त गृहरक्षक दलाच्या तुकडीसह साध्या वेशातील गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस सुरक्षिततासाठी तर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गजराज बोटींग क्लबचे जीव रक्षक तसेच घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज करण्यात आले आहेत. प्रस्थान व मार्गस्थ दिनी दिवसभर देहूत येणाऱ्या सर्व मार्गावर म्हणजेच देहूरोड ते देहू, आळंदीमार्गे तळवडे,चाकण-तळेगाव महामार्गावरील देहूफाटा मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असून रस्त्याच्या दुर्तफा उभ्या वाहनांवर,रस्त्यावरच लावण्यात येणारे हातगाडया,पथारीवाले यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी केला आहे.
महावितरणाकडून अखंडीत विद्युत पुरवठा, गावाबाहेर राज्य परिवहन महामंडळाचे एसटी व पीएमपीएमएलच्या बसेस उपलब्ध राहणार असून, ज्यादा वाहने सोडण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 27 वैद्यकीय अधिकारी, 60 आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक,परिचारिका, पुरेसा औषध साठा, विविध चार ठिकाणी बाह्यरूग्ण विभाग उभारण्यात आली असून 10 रुग्णवाहीका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
देहू नगरपंचायतीच्या वतीने चोवीस तास अखंडीत शुद्ध पाणी पुरवठा, शुद्ध पाण्यासाठी 5 हजार मेडिक्लोर औषध उपलब्ध करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे देण्यात आले आहे. 800 फिरते शौचालय उभारण्यात आले असून सुलभ शौचालय सुरू आहेत. 10 पाण्याचे टॅंकर उपलब्ध झाले असून आणखी दहा टॅंकर उपलब्ध करण्यात येणार आहेत . स्वच्छता, साफसफाई, औषध, धूर फवारणी, डी.डी.टी. पावडर टाकण्यात येत आहे. या सर्व कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून निविदातील कर्मचाऱ्यांकडून काम करण्यात येत आहे.तसेच नगरपंचायत कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण पथक सज्ज करण्यात आले असल्याची माहिती लेखपाल महेश वाळके,अक्षय रोकडे यांनी दिली. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था वारकरी, भाविकांना सेवा,सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहे. संत तुकाराम अन्नदान मंडळ कडून शनिवार पासून तीन दिवस अन्नदान सुरू बसणार असून प्रस्थानदिनी संपूर्ण दिवस अन्नदान वाटप करण्यात येणार आहे.