मानधन वाढीसाठी तहसीलदारांना दिले निवेदन
पाथर्डी – आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी आज आयटक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे जिल्हा सचिव सुधीर टोकेकर व तालुकाध्यक्षा मनीषा डांभे यांनी केले. नायब तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविकांच्या मानधनात तिप्पट वाढ करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आयटक संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.
त्यानुसार आज दुपारी नाईक चौकात सुधीर टोकेकर, मनीषा डांभे, अलका रूपनर, नसीम पठाण, मनीषा पालवे, नाजिया शेख, सविता शिंदे, सुवर्णा मरकड, अलका पालवे यांच्यासह सुमारे दोनशे महिलांनी काहीवेळ धरणे आंदोलन केले. यानंतर तहसील कार्यालयावर घोषणा देत मोर्चा नेण्यात आला. आंदोलक महिलांनी यावेळी आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या लावत निषेध व्यक्त केला. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर आंदोलकांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनातच धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाला नगरसेवक बंडू बोरुडे, अशोक गर्जे, इसाक शेख, कृषिराज टकले यांनी सहभाग घेत पाठिंबा दिला. यावेळी बोलताना सुधीर टोकेकर म्हणाले, मुंबई येथे या विषयावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शासनाने दिले होते, मात्र अजूनही ते पाळण्यात आले नाही. तातडीने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. या आंदोलनाची दखल नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी घेतली व त्यांनी आपल्या भावना शासनाला कळवण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.