महामेट्रोचे प्रयत्न : वनाज आणि रेंजहिल्स डेपोदरम्यान दोन मोठे मॉल
पुणे – महामेट्रोच्या वतीने वनाज ते गरवारे महाविद्यालय तसेच पिंपरी-चिंचवड ते दापोडी असे प्रत्येकी 5 किलोमीटर अंतराचे दोन मार्ग दि.26 जानेवारी रोजी सुरू करण्याचा “महामेट्रो’तर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामकाजासंबंधीची माहिती देण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या दौऱ्यावेळी ही माहिती देण्यात आली.
याशिवाय महामेट्रोच्या पुण्यातील वनाज आणि रेंजहिल या दोन्ही डेपोंमध्ये भले मोठे मॉल आणि 25 पेक्षा जास्त मजली व्यावसायिक इमारती होणार आहेत. व्यावसायिक इमारतींमधून पुणे मेट्रोला आर्थिक स्थैर्य देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. वनाज येथील महापालिकेच्या जुन्या कचरा डेपोच्या जागेवर वनाज डेपो बांधला जात आहे. एकूण साडेबारा हेक्टर जागा पालिकेने डेपोसाठी दिली. त्यातील अडीच हेक्टर जागेवर व्यावसायिक इमारती होतील. त्यात एक भला मोठा मॉल असेल. त्याशिवाय 25 पेक्षा जास्त मजली अशा व्यावसायिक इमारतीही त्यात असतील. यासाठीचे सर्व बांधकाम खासगी विकसकाकडून करण्यात येणार आहे. त्यात मेट्रोच्या प्रवाशांसाठी तसेच व्यावसायिक इमारतींमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी एकत्रित मोठा वाहनतळ असणार आहे. व्यावसायिक कारणासाठी दिलेली जागा वगळता उर्वरित जागेत डेपो असेल.
खालील बाजूस मेट्रोचे वर्कशॉप आणि वरच्या बाजूस मॉल, त्याशेजारील जागेत व्यावसायिक इमारती अशी ही रचना असेल. मेट्रो डेपोचे काम सध्या सुरू आहे. एकूण 20 गाड्या बसतील अशी शेड तयार करण्यात आली आहे. गाडीची दुरूस्ती, तिचे वॉशिंग हे सगळे अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठीच्या शेड बांधणाचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत वनाज ते गरवारे महाविद्यालय हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्यामुळे हे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. याच मार्गावरील एकूण 5 स्थानकांचे कामही जलद गतीने करण्यात येत आहे. त्यातील आयडियल कॉलनी, गरवारे महाविद्यालय या दोन स्थानकांचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे.
रेंजहिल कॉर्नर येथेही महामेट्रोचा डेपो असणार आहे. याही ठिकाणी मॉल आणि व्यावसायिक इमारती असतील. 20 गाड्यांची क्षमता असणारी शेड तसेच गाडी धुणे, दुरूस्त करणे यासाठी स्वतंत्र शेड असे काम सध्या सुरू आहे. याच जागेतून भूयारी मार्गाचे भूयार सुरू होणार आहे. भुयारी खोदण्यासाठीचे यंत्र (टीबीएम) तब्बल 90 पेक्षा जास्त मीटर लांबीचे आहे. ते मशीन जमीनीखाली जावे आणि त्याचे कार्य सुरू करावे यासाठी एक मोठा रॅम्प तसेच शाफ्ट तयार केला जात आहे. खोदकाम करणारे यंत्र ऑक्टोबरमध्ये पुण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष खोदाई सुरू होईल. खोदकाम सुरू झाल्यानंतर स्वारगेटपर्यंत 5 किलोमीटर अंतराचे दोन बोगदे आणि त्यात 5 स्थानके बांधण्यासाठी किमान 2 वर्षे लागतील अशी माहिती यावेळी “महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी दिली.