14 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू; बाधितांची एकूण संख्या 250
वाई (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी (दि. 18) रात्री आलेल्या अहवालांमध्ये वाई शहरात दहा तर तालुक्यात अन्यत्र चार जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्यात करोनाचा आलेख चढता असून आतापर्यंत बाधितांचा एकूण आकडा 250 झाला आहे. 120 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या 121 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण दहा जणांना जीव गमवावा लागला आहे.
वाई तालुक्यातील अहवालांनुसार वाई शहरातील धर्मपुरीमधील 27, 49 वर्षांचे पुरुष, पोलीस वसाहतीतील 65, 4, 30, 4, 18 वर्षांच्या महिला, 36 वर्षांचा युवक, सोनगीरवाडीतील 29 वर्षांचा युवक, सिद्धनाथवाडीतील 68 वर्षांचा वृद्ध, बोपेगावमधील 51 वर्षांची महिला, शेंदुरजणे येथील 39 व 40 वर्षांचे पुरुष, असे चौदा जण बाधित झाले आहेत.
पसरणी (राजेवाडी) येथील बाधिताचा मृत्यू झाला असून त्याच्यावर वाईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नावेचीवाडीतील नगरसेविका व तिच्या कुटुंबीांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना किसनवीर कॉलेजमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, वाई पोलीस ठाण्याचा कारभार पूर्ववत झाला असला पोलिसांना रस्त्यावर उतरण्याचे धाडस होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील बंदोबस्ताची मदार पालिका कर्मचाऱ्यांवर आहे. वाई-पाचगणी रस्त्यावरील मटण विक्रेत्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून मटण विक्री सुरू ठेवल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी तपासणी करण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.