स्वच्छतेचा अभाव, रुग्णांकडे दुर्लक्ष
प्राथमिक सुविधाही मिळणे दुरापास्त
फलटण (प्रतिनिधी) – फलटणमधील करोना हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधांची वानवा असल्याने रुग्णांची दमछाक होत आहे. प्राथमिक सुविधाही मिळणे कठीण असल्याने रुग्णालय म्हणजे नगरपरिषदेने केलेला केवळ दिखावा आहे का? डॉ. जे. टी. पोळ यांचे हॉस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेतले असताना तेथे करोनाबाधितांची व्यवस्था का केली नाही, असे प्रश्न फलटणकर विचारत आहेत.
फलटण नगरपालिकेच्या मालकीच्या, वर्षानुवर्षे बंद असलेल्या मुलींच्या वसतिगृहात करोना हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून तेथे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
तेथे दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक सुविधाही मिळणे दुरापास्त आहे. आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय नसल्याने रुग्णांना दोन दोन दिवस आंघोळ करता येत नाही. रुग्णांना चहा व पिण्यासाठी गरम पाणी दिले जात नाही. रुग्णांचे नातेवाईक गेटपर्यंत जाऊन रुग्णासाठी पाणी, खाद्यपदार्थ व जेवणाचे डबे देताना दिसतात. त्यातून नातेवाइकांना व इतरांना करोनाची बाधा होण्याचा मोठा धोका आहे. रोटेशननुसार एक खाजगी डॉक्टर व एक सिस्टर यांच्यावर 25 ते 30 रुग्णांची जबाबदारी आहे.
दुर्दैवाने रुग्णाची प्रकृती खालावल्यास व्हेंटिलेटर किंवा आयसीयूची सुविधा उपलब्ध नाही. तेथे दाखल असलेल्या एका रुग्णाशी संपर्क साधला असता, त्याने सांगितले की, पाच दिवसांत एकच मावशी साफसफाईसाठी येते. पाच दिवसांमध्ये एकही सफाई कामगार फिरकलेला नाही. संडास, बाथरूमची अवस्था दयनीय आहे. तेथे स्वच्छता केली जात नाही.
हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी कचरा ओसंडून वाहत आहे. रुग्णांच्या रुमची साफसफाई व जंतुनाशक फवारणी गेल्या पाच दिवसांमध्ये झाली नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ऑक्सिजन संपला तर त्याबाबत सांगण्यासाठीसुद्धा कर्मचारी उपलब्ध नसतो. या तक्रारींची शहानिशा करून प्रशासनाने तेथे आवश्यक सुविधा पुरवाव्यात अन्यथा रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी जाणकार करत आहेत.