सह्याद्री वाहिनीवर आजपासून पहिली ते आठवीसाठी “टिलीमिली’ कार्यक्रम
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या शाळा कधी सुरु होणार? की शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार? याची चिंता पालक व विद्यार्थ्यांना भेडसावत असतानाच रविवारी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीचा (मराठी माध्यम) बालभारतीचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम सोमवारपासून (दि.20) सह्याद्री वाहिनीवर आनंददायी शिक्षण देणारी “टिलीमिली’ही मालिका प्रसारित होणार असल्याचे जाहीर केले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यावर्षी शाळा सुरु होताहेत की नाही याची चिंता लागली होती. ऑनलाईन शिक्षण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याने शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, रविवारी वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दूरदर्शनवर (टीव्ही) डी. डी. सह्याद्री या वाहिनीवर इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण देणारी “टिली-मिली’ ही विशेष
अभ्यास मालिका प्रसारीत होणार आहे. इयत्ता निहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे – इयत्ता आठवी – स. 7.30 ते 8.00, इयत्ता सातवी – स. 8.00 ते 8.30, इयत्ता सहावी – स. 9.00 ते 9.30, इयत्ता पाचवी – स. 9.30 ते 10.00, इयत्ता चौथी – स. 10.00 ते 10.30, इयत्ता तिसरी – स. 10.30 ते 11.00, इयत्ता दुसरी – स. 11.30 ते 12.00, इयत्ता पहिली – स. 12.00 ते 12.30. डीडी सह्याद्रीच्या टाटा स्काय 1299, एअरटेल – 548, डिश टीव्ही – 1229, व्होडाफोन डी 2 एच – 769, डीडी फ्री डिश – 525, हॅथवे – 513, जेपीआर- 561 या चॅनेलवर या मालिकेचे प्रसारण होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. रविवारी या आनंददायी शाळेस सुट्टी असणार आहे. 1 ली ते 8 वीचा बालभारतीचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम या शाळेतून शिकवला जाणार आहे.