वेल्हे -वेल्ह्यात करोनाने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. वेल्ह्यातील एकाच गावातील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
शनिवारी (दि. 18) वांजळे येथील सात जणांचा आणि सोंडे सर्फाला येथील एकाचा असे एकाच दिवशी आठ व्यक्तींना करोनाची लागण झाल्याची माहिती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वांजळे येथील दोघांना गुरुवारी (दि. 16) करोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील संशयितांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यापैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वांजळे या एकाच गावात 10 रूग्ण झाले आहेत.
सोंडे सर्फाला येथील लागण झालेली व्यक्ती वेल्ह्यातील पशू दवाखान्यातील कर्मचारी असून कोव्हिड सेंटरमध्ये काम करत होती. त्यांच्या संपर्कातील 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
वेल्हे तालुक्यात आतापर्यंत 34 रुग्णांनी करोनावर मात केली असून, सध्या 24 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यामुळे तालुक्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या 58 झाली आहे.
दरम्यान, गेल्या साडेतीन महिन्यांत वेल्हे तालुक्यात करोनाचा विळखा घट्ट झाला आहे. बाधितांची आकडेवारी वाढल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट पसरली आहे.