वॉशिंग्टन : अमेझॉनचे खोरे हा सर्वात घनदाट जंगल प्रदेश मानला जातो. या जंगल प्रदेशात जैवविविधता आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात केवळ नदी आहे असं नाही तर तलाव पण आहेत आणि या तलावांमध्ये विविध प्रकारचे जलचरपण आहेत. आता गेल्या काही कालावधीमध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने त्याचा परिणाम या जैवविविधतेवर झाला आहे.
गेल्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल 100 डॉल्फिन माशांचा मृत्यू झाला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात विविध ठिकाणी असलेल्या तलावांचे पाणी दुष्काळामध्ये कमी झाले आहेत. शिवाय या पाण्याचे तापमानही वाढले असल्याने त्याचा थेट फटका डॉल्फिन माशांना बसला असून या माशांचा मृत्यू त्यामुळेच झाला आहे.
खोऱ्यातील लेक टाफे हे डॉल्फिन माशांसाठी प्रसिद्ध आहे, त्याच ठिकाणी सर्वात जास्त डॉल्फिन माशांचा मृत्यू झाला आहे. इतरही काही तलावांमध्ये डॉल्फिन माशांना अशा प्रकारे जीव गमवावा लागला असायची शक्यता व्यक्त होत आहे. पर्यावरणवाद्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून ज्या तलावातील पाणी कमी झाले आहे आणि त्यातील पाण्याचे तापमान वाढले आहे.
तेथील डॉल्फिन माशांना एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर करून अन्य सुरक्षित ठिकाणी नेण्याचा विचार आता सुरू झाला आहे ज्या ठिकाणी या डॉल्फिन माशांना स्थलांतरित केले जाणार आहेत तो प्रदेशही सुरक्षित आहे का नाही हे प्रथम पाहिले जाणार आहे अमेझॉन चे रेन फॉरेस्ट तब्बल 55 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आहे.
या जंगल प्रदेशांमध्ये असलेली ॲमेझॉन नदी आणि इतर जलस्त्रोतांमध्ये आढळणारे डॉल्फिन हे त्याचे वैशिष्ट्य आहे. डॉल्फिन हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जलचर असून पाण्याखाली 900 फुटापर्यंत तो राहू शकतो. पण डॉल्फिन अतिशय संवेदनशील असल्याने वातावरणातील किंवा पर्यावरणातील किरकोळ बदलही त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.