हरिद्वार – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी एक दिवसीय हरिद्वार दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी ऑटो रिक्षामध्ये बसून हरिद्वार शहरात प्रवास केला. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी केजरीवाल यांचा रिक्षातून प्रवास करत असतानाचा एक फोट सुद्दा व्हायरल झाला आहे.
रविवारी अरविंद केजरीवाल डेहराडूनच्या जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचले, तिथे आप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी आपचे प्रभारी मोहनिया आणि कर्नल अजय कोथियाल (सेनी) यांच्यासह शेकडो कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले. येथून ते हरिद्वारला रवाना झाले. हरिद्वारला पोहोचल्यावर केजरीवाल यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर केजरीवाल यांनी टॅक्सी, ऑटो, ई-रिक्षा युनियनची बैठक घेतली.
बैठकीत केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील आपच्या विजयात 70 टक्के ऑटोचालकांचा वाटा आहे. दिल्लीतील ऑटोवाले मला आपला भाऊ मानतात. त्याचवेळी हरिद्वारमध्ये केजरीवाल यांनी दिल्लीच्या धर्तीवर मोफत तीर्थयात्रा करण्याची नवी घोषणा केली आहे. मोफत वीज आणि रोजगारानंतर केजरीवाल यांनी उत्तराखंडमध्ये मोफत तीर्थयात्रेची हमी दिली आहे.
टॅक्सी, ऑटो, ई-रिक्षा युनियनसोबत झालेल्या बैठकीदरम्यान केजरीवाल म्हणाले की, करोना संक्रमण काळात दिल्लीत लॉकडाऊन लागू असताना आम्ही ऑटोचालकांच्या खात्यात सुमारे दीडशे कोटी रुपये जमा केले. ते म्हणाले की, हरिद्वारमध्ये मी तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आलो आहे, मी तुम्हाला भाऊ बनवण्यासाठी आलो आहे. आता तुमच्या सर्व समस्यांची मी जबाबदार घेत आहे. यानंतर त्यांनी एका ऑटो रिक्षावर आम आदमी पार्टीच्या प्रचाराचे पोस्टर लावले आणि त्यावर बसून ते हरिद्वार शहराकडे रवाना झाले.
यादरम्यान, आगामी निवडणुकीत आप पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कर्नल अजय कोथियाल (सेनी) हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.