Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्ली गुन्हे शाखेचे एक पथक दाखल झाले आहे. काल संध्याकाळी उशिरादेखील गुन्हे शाखेची टीम नोटीस घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती, मात्र कोणालाही नोटीस न मिळाल्याने दिल्ली पोलिस रात्री तेथून परतले. सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने नोटीस घेण्याचे मान्य केले आहे. तर सीएमओ पावती देण्यास तयार नसल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.
VIDEO | The Crime Branch team of Delhi Police reaches CM Arvind Kejriwal’s residence in connection with probe into AAP’s allegations that the BJP was trying to poach AAP MLAs. pic.twitter.com/CFLkW3g1P0
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2024
गुन्हे शाखेची टीम काल संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी नोटीस देण्यासाठी पोहोचली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणीही नोटीस स्वीकारली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेची टीमही नोटीस घेऊन रात्री मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. तिकडेही कोणी दखल घेतली नाही. अशा स्थितीत काल रात्री गुन्हे शाखेचे पथक दोन्ही ठिकाणाहून रिकाम्या हाताने परतले होते.
पोलिसांना द्यावी लागतील प्रश्नांची उत्तरे
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पहाटेच आनंद व्यक्त केला होता. आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये,”आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील,”असे त्यांनी लिहिले होते.
‘आप’च्या नेत्यांकडून भाजपवर करण्यात आले आरोप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजप नेते आम आदमी पक्षाच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवून फोडू इच्छितात. यानंतर मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत भाजपने सात आमदारांशी संपर्क साधून प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. याशिवाय त्यांना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे आमिषही देण्यात आले आहे. भाजपला पक्षाचे 21 आमदार फोडायचे आहेत.