जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला…

लॉकडाऊन ने भरपूर वेळ भेट दिला अन अंगातले कित्येक किडे हळूहळू बाहेर यायला लागले…
नुकतीच जी ए कुलकर्णींची काजळमाया वाचायला घेतली अन पहिल्याच कथेत हरखून गेलो. एवढं सुंदर वाटलं म्हणून सांगू…
एक जाणवलं… आयुष्यातला आनंद ज्यामध्ये सामावलेला असतो अशा काही अमूर्त गोष्टी असतात. छानसं संगीत, बहारदार पुस्तकं, संपन्न संपृक्त करणारे छंद, नवनवीन गोष्टी शिकत राहण्यातला, करत राहण्यातला अवीट आनंद….आणि तो आनंद असेल ना तर काहीही कमी वाटत नाही मग आयुष्यात.. हा आनंद लुटायला अन वाटायला शिकलो आपण की सगळं कसं पूर्ण असतं..
अशा अमूर्त गोष्टींनी आयुष्य सजवायचं असतं.
आपल्या चिंतांचा रंग त्यांना नसतो द्यायचा. तर त्यांच्या त्या स्पर्शाने आपण रंगून जायचं असतं.
आपल्या चिंता विसरायच्या असतात..

काही गोष्टी शिकायच्या होत्या. करायच्या होत्या. बहाणा वेळेचा होत होता. आता आपसूकच एवढा वेळ मिळतोय म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी कमरेवर हात ठेऊन समोर येऊन उभ्या राहिल्या. अन खदखदून हसून म्हणाल्या, “तुझे सगळेच excuses संपलेत आता .. कंटाळा जिंकतो की तू बघूयात”..
पण खरंच.. बऱ्याच नवीन गोष्टी करून पाहतोय. टवटवीत राहायची , स्वतःला अपडेट करायची , नवनवीन गोष्टींची मजा घ्यायची सवय लावली की फ्रेश राहतो आपण .. get busy be happy असं म्हटलं जातं हे अगदीच खरये.

एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे फिटनेस. शरीराचा . मनाचाही. आत्मिक उर्जेचाही.
आवडेल तो व्यायाम योगा, ध्यान , प्राणायाम हे आपल्याला अत्यंत उर्जावंत ठेवत. ही आयुष्यभराची गरज आणि इंधन आहे आपलं. हे धगधगत राहिल तोवर आपल्याला ऊर्जेची कमी कधीच पडणार नाही.
त्यामुळे याबद्दल जागरूक राहून मी लॉकडाऊन मधून अगदी फिट आणि आनंदी बाहेर यायचं असं ठरवलंय.
हे माझं लॉकडाऊन…


पण जरा आजूबाजूला पाहिलं की…
अजूनही काही रंग आहेतच की…
अंगावर कपडा नाही डोक्यावर छप्पर नाही हे असं काहींचं जग असतं सर्वांपेक्षा भिन्न..
कोणाच्या ताटात नाही पडत अजून ही पोटभर अन्न..
कुणी तडफडतो दिवसभर उन्हातान्हात गजरे विकत पोटाची खळगी भरण्यासाठी…
अन त्याच घरातला कुणी तरुण धडपडतो भटक्या कुटुंबाची चाकोरी मोडणाऱ्या पहिल्या वाहिल्या यशासाठी….
कामाला येऊ शकलो आपणही कोणाच्या…तर त्याहून मोठं कुठलं सुख नसतं…
त्यांच्या गरजा फार नसतातच…. इवल्या इवल्याशा यशाचं त्यांना काय भारी मोल असतं…

आपल्यासाठी झटणारे कितीतरी अगम्य हात असतात..
त्यांच्याविषयी कृतज्ञतेने भरून जाणारं आपलंच काळीज असतं…
दूधवाले काका, कचरा नेणाऱ्या ताई, पोलीस मामा अन नर्स… शेतकरी राजा… जवान बंधू…अन कितीतरी…
डॉक्टर्स बद्दल तर आपण आत्ता बोलावं तेवढं कमीच आहे..
बघितलं तर त्यांच्याशिवाय आपलं खरंच पानही हलत नसतं….
रोज उठल्यावर आधी एक सलाम ठोकावा या सेवेला..
खरंच आपण एकटेच आयुष्यात , पुरेसे असतो का आपल्याला..

या सगळ्या आपल्या जाणिवा लॉकडाऊन ने जाग्या केल्याएत . जो तो या गोष्टींचा विचार करताना दिसतोय. ही कृतज्ञता लॉकडाऊन ची खरी देणगी आहे असं मला वाटतं.
लॉकडाऊन मुळे आपण एकत्र जगलं पाहिजे , एकमेकांच्या कामी आलं पाहिजे हे मात्र नक्की शिकलोय.

यश, धडपड, पैसापाणी हे महत्त्वाचं आहे.. अगदी आणि अगदी खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती जीवन चालतं. पण ते सगळं अजून छान साध्य करण्यासाठी आपण मजबूत असलं पाहिजे. म्हणून मजबूत असा फिटनेस, माणसांच्या सहवासाचा , छंदांचा आनंद घेणं, वाचणं , लिहिणं, संगीत ऐकणं, नृत्य, काव्य, अभिनय अशा कित्येक गोष्टी करून पाहण्यातली मजा घेऊन स्वतःला जिवंत ठेवलं पाहिजे..

हा आनंद , शांतता, आरोग्य, सकारात्मकता , माणुसकी अन कष्ट करण्याची तयारी ही आपली खरी संपत्ती..
आपण भरपूर कमवावं अन इतरांच्या कामी यावं. यातलं समाधान आजन्म पुरणारं आणि जगायला अतिशय बळ आणि आनंद देणारं असतं हेच लॉक डाऊन ने आपल्याला दाखवून दिलं…

आणि सर्वांत मोठी शिकवण तर आपण सगळे कधीच विसरणार नाही. निसर्ग हीच आई अन बाप आहे आपला. अती करू तिथे माती नक्की होईल…
खरंय ना…

शेवटी हा काळही निघून जाईल… नवी पहाट नक्की येईल.. अर्थात.. आपल्याला योग्य त्या मर्यादा सांभाळायची अन आयुष्य अधिक चवीनं, शांततेनं अन एकमेकांच्या सोबतीने जगायची शिकवण देऊनच..!!!
येणाऱ्या काळात स्वतःचं आयुष्य अन देश उभारायला अधिक हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल व एकमेकांवर, माणुसकीवर कृतज्ञतेने प्रेम करावेच लागेल…!!
शेवटी अविनाश धर्माधिकारी सरांच्या काही ओळी मला इथे समर्पक वाटतात…

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी
मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी
हवी फक्त उन्मुक्त निर्माणभक्ती
नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती

जरी एक अश्रू पुसायास आला.
तरी जन्म काहीच कामास आला..
तरी जन्म काहीच कामास आला…
तरी जन्म काहीच कामास आला….!!!

– ऋषिकेश कदम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.