नैनीताल – कॉंग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला करण्यात आला. खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राकेश कपिलसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड करून आग लावण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सलमान खुर्शीद यांच्या “सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी स्वतः फेसबुकवर त्यांच्या नैनीताल येथील घराला आग लागल्याचे फोटो तसेच घराच्या काचा फोडण्यात आल्याचे फोटो शेअर केले आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचे दिसत आहे.