महेश जाधव
मायणी – अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचे खटाव तालुक्यातील मायणीपासून तीन किलोमीटरवर असलेल्या धोंडेवाडी येथील पाझर तलावात आगमन झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील पाझर तलावात दाखल झाल्याने पक्षीनिरीक्षक आणि पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लालबुंद चोच, लांब सडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना “अग्निपंख’ असंही संबोधलं जातं. सध्या या पाझर तलावात फ्लेमिंगोची संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसांतच हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल होतील. फ्लेमिंगोच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद असतात. त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. फ्लेमिंगोबरोबर इतर पक्ष्यांचे थवेही येथे असल्याने येथे भेट देणारा आनंदित होऊन जात आहे. परिसरातील पक्षीप्रेमींचे तलावाच्या दिशेने पाऊल पडू लागल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षाप्रमाणे याहीवर्षी फ्लेमिंगोच्या आगमनामुळे निश्चितच खटाव तालुक्याच्या वैभवात पुन्हा भर पडणार आहे.
पर्यटक, पक्षी निरीक्षक व पक्षीप्रेमींना निसर्गाने संधी उपलब्ध करून दिली असून सध्या मायणी, येरळवाडी व धोंडेवाडी येथील तलावात पाणीसाठा उपलब्ध असल्याने हजारो किलोमीटरचा प्रवास करत फ्लेमिंगोने हजेरी लावली आहे. परिसरात थंडीची चाहूल सुरू झाली की, नोव्हेंबर- डिसेंबरच्या कालावधीत हे पक्षी तलावात दाखल होतात. मात्र, यावेळी थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे जानेवारीमध्ये या परदेशी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.
खटाव तालुक्यात मायणी यथील पक्षी आश्रयस्थानामध्ये नेहमी फ्लेमिंगोचे आगमन होत होते. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांपासून या भागात पाऊस न पडल्यामुळे तलावात पाणीसाठा झाला नसल्यामुळे फ्लेमिंगोने पाठ फिरवली होती. यावर्षी मायणी तलावात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे काही दिवसांतच हे फ्लेमिंगो मायणी तलावात हजेरी लावतील, असा अंदाज आहे. गतवर्षी येरळवाडी तलावात पाणीसाठा असल्याने फ्लेमिंगोनी हजेरी लावली होती. या वर्षी मात्र धोंडेवाडी येथे हजेरी लावली असून ही पक्षीनिरीक्षक आणि पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
त्यामुळे पक्षीप्रेमी, पर्यटक व छायाचित्रकारांची पावले तलावाच्या दिशेने वळू लागली आहेत. फ्लेमिंगोबरोबरच नाम्या, सुरुची, नकटा, चक्रवाक, शराटी, नदी सूरय, पाणकोंबड्या, चमचचोच्या, राखी बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा, टीबुकली, रंगीत करकोचा, जांभळी पाणकोंबडी, खंड्या, करकोचा, तूतवार, तापस तुतारी आदी पक्षी सध्या मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. यामुळे पक्षीप्रेमींत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खटाव तालुक्यासह परिसरातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.