सोमेश्वरनगर – गौराई आली सोन्याच्या पावलांनी.. गौराई आली माणिक-मोतींच्या पावलांनी.. असे म्हणत गुरुवारी सर्वत्र सर्वाच्या लाडक्या गौराईचे गुरुवारी (दि. 5) आगमन होणार आहे. त्यामुळे गौरींच्या स्वागतासाठी सोमेश्वर परिसरातील घरोघरी तयारी सुरू असून गौरींचे मुखवटे रंगविणे, त्यांचे हात, पाय, पावले, स्टॅण्ड, अलंकार तसेच पूजेचे व सजावटीचे साहित्य जमविण्यासाठी महिलांची लगबग बुधवारी (दि. 4) सुरू होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत गौरी आगमनाचा मुहूर्त असल्याचे पुण्यातील गुरुजी तेजस सप्तर्षी यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीनंतर दोन दिवसानंतर ज्येष्ठ गौरी उत्सवाला सुरूवात होते. तीन दिवसांच्या गौराईचे स्वागत करण्यासाठी महिलावर्गात उत्साह दिसून येत आहे. सोमेश्वर परिसरात गौराईच्या स्वागताची लगबग दिसून येत होती. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला सोमेश्वरनगर परिसरातील बाजारपेठेत गौरी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती. गौरी सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यात गौरीच्या दागिन्यांना अधिक महत्त्व असते. 100 रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत गौरीच्या सजावटीचे साहित्य महिला खरेदी करीत होत्या. गौरीच्या दागिन्यांत मंगळसूत्र, नथ, कंबरपट्टा, राणीहार आदी दागिनेही महिला आवडीने खरेदी करत होत्या. विशेषत: भाजी-भाकरीच्या नैवेद्याला. या सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग दिसून येत होती.
दरवर्षीप्रमाणे, यंदाही मुखवट्यांच्या गौराईना अधिक पसंती दिली जात आहे. गौराईच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या साड्या खरेदीसाठी दुकानात महिलांची गर्दी झाली होती. यामध्ये भरजरीच्या, रंगीबेरंगी, विविध नक्षीकाम असलेल्या साड्यांना विशेष मागणी होती. टिकली आणि एम्ब्रॉयडरी काम केलेल्या सिल्क बांधणीच्या साड्यांनाही मोठया प्रमाणात मागणी असल्याचे सोमेश्वरनगरातील एका साडी विक्रेत्याने सांगितले. सध्याच्या घडीला तयार (आयते) खाद्य पदार्थांना मोठी मागणी असल्याने सोमेश्वर परिसरातील मिठाईची दुकाने विविध खाद्य पदार्थांनी सजली होती. यामध्ये चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळी, करंजी, म्हैसूरपाक आदी खाद्यपर्थ खरेदीसाठीही मिठाईच्या दुकांनामंध्ये गर्दी झाली होती.
गौरी बसवण्याच्या पद्धती वेगळ्यावेगळ्या
गौरी बसवण्याच्या पद्धती सर्व घरांमध्ये वेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर विराजमान होतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या आणि खडयांच्या गौरी असतात. गौरी-गणपतीचा सण थाटामाटात साजरा केला जात आहे. गौराईच्या आगमनाने खास महिलावर्गात उत्साह असतो.