मंचर-लोणी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना मंचर पोलिसांनी शुक्रवारी (दि. 10) अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेले गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
लोणी येथे शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सहाय्यक फौजदार आर. पी. कांबळे व पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे हे गस्त घालत असताना तलाठी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत अरबाज राशिद खान (वय 21 रा. बाबुरावनगर ता. शिरुर) आणि ओंकार नवनाथ भोसले (वय 21 रा. पीडब्लूडी कॉलनी, शिरुर ता. शिरुर) हे दोन तरुण संशयितरित्या फिरत असताना आढळून आले. पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे, विशाल चितारे यांनी संबधित तरुणांना आवाज देऊन थांबवले असता दोन्ही तरुण पळू लागल्याने पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. त्यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा पिस्टल व तीन जिवंत काडतुसे असे एकूण 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत मंचर पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू कांबळे करत आहेत.