धाराशिव – धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर शनिवारी सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत सोन्यासह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातला गेल्याने खळबड उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरोडेखांचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत.
जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझामधील ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली. घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून सदर घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.