क्षेत्र 57 आर; ऑनलाइन सातबारावर 29 आरचीच नोंद

तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले ः दोन तहसीलदार बदलूनही निकाल नाही

सविंदणे-हस्तलिखीत उताऱ्यावर 57 गुंठे क्षेत्राची नोंद आहे. मात्र ऑनलाइन काढलेल्या सातबारावर 29 गुंठेच नोंद झाली. यासाठी टाकळी हाजी येथील शेतकऱ्याने शिरूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले, या काळात दोन तहसीलदार बदलले मात्र निकाल काही लागला नाही.
याबाबतची माहिती अशी की, टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी सखाराम म्हाळू घोडे यांची टाकळी हाजी हद्दीतील जमीन गट नं. 997च्या एकूण क्षेत्रात त्यांची जमीन 57 आर आहे. हस्तलिखित उताऱ्यावर तशी नोंद आहे. पण ऑनलाइन उतारा संगणकीकृत करताना 29 आर अशी होऊन क्षेत्राबाबतचा दोष निर्माण झाला होता.

ही बाब त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यासाठी त्यांनी शिरूर तहसील कार्यालयात 17/05/2017 रोजी रणजित भोसले तहसीलदार असताना चूक दुरुस्तीसाठी कलम155 अन्वये अर्ज केला होता. त्यांनी वेळोवेळी सुनावणी घेतली. पण निकाल देताना त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी गुरु बिराजदार यांनी पदभार घेतल्यानंतर या विषयाची पुन्हा अनेकदा सुनावणी घेतली. सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर फाईल बंद केल्यानंतर निकाल देण्यास टाळाटाळ झाली. काही दिवसानंतर त्यांची बदली होणार होती हे त्यांना माहीत होते. त्यांची बदली झाल्याने ते ही निकाल न देता निघून गेले. या सर्व प्रकारामुळे चूक नसताना सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला चूक दुरुस्तीसाठी कचेरीत अनेकदा हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक व शारीरीक भुर्दंड पडत आहे.शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून वरिष्ठांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी. अशा प्रकारच्या दुरुस्तीच्या अनेक फायली प्रलंबित असल्याचे निदर्शनात आले आहे.

  • या विषयी नवनिर्वाचित तहसिलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या अनेक फाइली प्रलंबित असल्याचे निदर्शनात आले आहे. निवडणूक झाल्यावर ही कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील.
    -लैला शेख, नवनियुक्‍त तहसीलदार शिरूर
  • ऑनलाइन उताऱ्यावरील सर्व चूक संबंधित विभागाची असतानाही या निगरघट्ट अधिकाऱ्यांना टेबलाखालून पैसे न दिल्याने तहसीलदारांनी चूक दुरुस्तीचा निकाल दिला नाही. अशा अनेक केसेस या कार्यालयात प्रलंबित आहे. तहसील कचेरीत एजंटांचा सुळसुळाट झाला असून एका नायब तहसिलदारांमार्फत पैसे मोजल्यास तहसीलदारांकडून तात्काळ निकाल दिला जात होता. ‘सरकारी काम अन्‌ बारा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही. वेळेत काम होत नसून वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.
    -सखाराम घोडे, तक्रारदार शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)