बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, गुळुंचवाडी, पेमदरा, आनंदवाडी येथील गारपीट व चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार अतुल बेनके व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली आहे.
या भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अतुल बेनके यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शनिवारी (दि.2) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुमारे अर्धा तास झालेल्या गारपीट व चक्रीवादळाने पेमदरा, आणे, आनंदवाडी, गुळुंचवाडी या परिसरातील कांदा व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुळुंचवाडीतील ठाकर वस्तीमधील समाज मंदिराचे पत्रे उडून गेले आहेत. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असून गारपीट व चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळवून देणार असल्याचे आमदार अतुल बेनके व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी यावेळी सांगितले.