देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीने मागविलेल्या निविदेतील सव्वा तीन कोटींच्या २४ रस्त्यांची कॉंक्रिटीकरण व गटार काम, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चव्हाण नगर येथे सुमारे ७८ लाखांच्या खर्चाचे पथदिवे व भूमिगत केबल करणे, बाजार आळी येथे वडाच्या झाड परिसर सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी सुमारे साडेअकरा लाख रूपयांच्या निविदांना मंजूरी देण्यात आली.
देहू नगरपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा झाली. नगराध्यक्ष तथा स्थायी समिती अध्यक्षा पूजा दिवटे, उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छता वैद्यक सभापती सुधीर काळोखे, बांधकाम सभापती पूनम काळोखे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा परदेशी, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे व विविध विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.
नगरपंचायतीने बांधकाम व आरोग्य विभागामार्फत मागविलेल्या विविध निविदांना तर नगररचनाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. देहू नगरपंचायत हद्दीतील आकाशचिन्हे, फ्लेक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ग्लो लाईट आदी सर्व प्रकारच्या जाहिरातींना ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी देण्यासाठी संगणक अद्यावलीच्या ५ लाख ७२ हजार रुपयांच्या निविदेला तर आरोग्य विभागातील साहित्य पुरवठा करणे, जेसीबी, सक्शन व जेटिंग मशीन पुरवठा करणे, जलपर्णी काढणे अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली.
पाच टक्के दिव्यांग निधी
तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत देहू पाणीपुरवठा योजनेसाठी माळीनगर येथील सर्व्हे नंबर ११० व १०५ मधील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचे भूसंपादन करणे व त्यासाठी येणाऱ्या अनुषंगिक खर्चास, देहूतील सर्व्हे क्रमांक ४४, ४५, ४६, ५२, ५३ व विठ्ठलनगर येथील ८५, ८६, ८७ मधून जाणाऱ्या २४ मीटर रुंदीचे प्रादेशिक नकाशातील रस्त्याबाबत चर्चा करून १२ मीटर रुंदीकरण करण्यास व भूसंपादनास तसेच दिव्यांग बांधवांना एका निवासी मालमत्ता करातून ५० टक्के घरपट्टी माफ करणे व आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ५ टक्के दिव्यांग निधी वाटप करणे अथवा साहित्य देणे बाबत मंजुरी देण्यात आली.
काळोखे यांच्या पाठपुराव्याला यश
युनिक केअर रुग्णालय, भीमाशंकर सोसायटी मार्गे गायरान जमिनीकडे जाणारा रस्ता आणि मारुती काळोखे चौक ते रिंगरोड दरम्यानचा नियोजित २४ मीटर रुंदीचा रस्त्याचे १२ मीटर रूदींकरण करण्यासाठी व भूसंपादन प्रक्रिया करून त्वरित रस्ता लवकर करण्यासाठी नगरसेवक योगेश काळोखे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारा मीटर रुंदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.