वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – स्थानिक भूमिपूत्र यांच्या फायद्याचा कोणताही विचार न करता बिल्डर धार्जिना विकास आराखडा वडगाव मावळ नगर पंचायतीकडून बनविण्यात आला आहे, असा आरोप वडगाव शहर भाजपने केला आहे.
याबाबत सर्वपक्षीय पदाधिका-यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी गुलाबराव म्हाळसकर, गणेश ढोरे, रुपेश म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर, सचिन ढोरे, सोमनाथ ढोरे, किरण भिलारे, किरण म्हाळसकर, भुषण मुथा, शरद मोरे, रविंद्र म्हाळसकर, गणेश भेगडे, विनायक भेगडे, मकरंद बवरे, तानाजी तोडकर, शांताराम म्हाळसकर, महादू कुडे, महेंद्र म्हाळसकर, प्रफुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
वडगाव बाजार पेठेतील रस्ता हा 15 ते 18 मीटर रुंदीचा केलेला असून, तो 10 ते 12 मीटरचा असावा. मागील 10 वर्षामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर झालेल्या ओपन स्पेस, एमिनिटी स्पेस या जागा क्रिडांगण, गार्डन, व्यायामशाळा वा अन्य बाबींसाठी, नागरिकांच्या सोयीकारिता ताब्यामध्ये घ्याव्यात. तसेच स्थानिक शेतकरी यांनी अनेक वर्षापासून जपून ठेवलेल्या जमिनींवर टाकलेले आरक्षण काढून, ते त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
आंबेडकर कॉलनीमधील, हातावर पोट भरणा-या गोरेगरीब जनतेच्या घरावर पार्किंग व किफायतशीर घरे याकरिता आरक्षण दाखविले आहे, ते रद्द करण्यात यावे. शेतक-यांच्या माळरान सपाट जमिनीवर वनिकरण असा शेरा दिसत असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपाने निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष बोलून मुख्यधिकारी प्रविण निकम यांच्याकडे कली आहे. तसेच त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले.