पिंपरी -पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने शहरामध्ये काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणचे चौक व रात्रीच्यावेळी निर्मुनष्य असणाऱ्या ठिकाणांवर कॅमेरे लावण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्याचा मार्ग मोकळा झाला असून गुरूवारी (दि. 27) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच यासह 207 कोटी 74 लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा आज पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाकरीता सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात महापालिका सभेने 200 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर केली आहे. सीसीटीव्ही सर्व्हेलन्स कामासाठी पोलीस दल, नागरिक आणि नगरसदस्यांची मागणी विचारात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणेचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार शहरामध्ये तीन हजार कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यासाठी 178 कोटी 48 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
तसेच पिंपळे गुरव येथील जिजाऊ उद्यानाची देखभाल करण्यासाठी 85 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. इ प्रभागातील पाण्याच्या टाकीखाली वॉचमन क्वार्टर बांधण्यासाठी 45 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 16 मधील रावेत भागातील गुरुद्वारा परिसरातील पेव्हिंग ब्लॉक, स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 26 लाख रुपये, इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग 4 आणि 5 मध्ये ड्रेनेज लाईन आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 78 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रभाग क्रमांक 23 मध्ये सर्वे नंबर 1 येथील सीमाभिंत बांधण्यासाठी आणि वाहनतळ विकसित करण्यासाठी 35 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. पिंपळे निलख येथे विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या खोदाईचे चर बुजवण्याकरीता आणि आवश्यकतेनुसार रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी 92 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याला स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली.
भोसरी रुग्णालयात सुसज्ज ग्रंथालय
नवीन भोसरी रुग्णालयात तळ मजल्यावर वाचनालयासाठी आरक्षित असणाऱ्या 4 हजार चौरस फुट जागेत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारण्यास मागील महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. या ग्रंथालयासाठी आज स्थायी समितीने ऐनवेळच्या विषयामध्ये 15 लाख रुपये मंजूर केले आहेत.