छाननी दरम्यान दोन अर्ज झाले बाद
भोर : विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. 4) 13 उमेदवारांचे 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर शनिवारी (दि. 5) या दाखल उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली असता दोन अर्ज बाद झाले असून 18 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहाय्यक निवडणूक नर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या स्वरुपा संग्राम यांच्या दोन नंबरला अर्ज असल्याने तर बहुजन समाज पार्टीचे सिद्धराम जयवंत वाघमारे यांनी सूचक म्हणून मतदारसंघा बाहेरील व्यक्तीचे नाव दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून सोमवार दुपारी तीननंतर भोर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे व यादी जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, शिवसेना व भाजप पक्षातील काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अनेकांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केले असून यातील कोण कोण माघार घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी महाआघाडीचे आघाडीचे अधिकृत उमेदवार कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे व महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्यातच खरी लढत रंगणार असल्याचे असल्याचे बोलले जात आहे.