मुंबई – लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अनुराग कश्यपची आज आठ तास चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत वर्सोवा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. अभिनेत्री पायल घोष हिने काही दिवसांपूर्वी अनुरागवर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते.
यातच अनुराग कश्यपने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत. अनुरागच्या वकिलांनी याबाबत पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,’संपूर्ण ऑगस्ट 2013 मध्ये त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी कश्यप श्रीलंकेत होते आणि त्यासंदर्भातील दस्ताऐवजांचा पुरावा त्यांनी दिला आहे. कश्यप यांनी आरोप करण्यात आलेली अशी काही घटना घडलीच नसल्याचे सांगितले आहे आणि त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.’
अनुरागच्या वकिलांनी पुढे असे म्हटले आहे की, ‘न्यायालयीन प्रक्रियेच्या निकालाची पर्वा न करता कश्यप यांची निंदानालस्ती करण्याच्या हेतूने ही कथित 2013 ऑगस्टमधील घटनेबाबत अचानक आणि उशिरा करण्यात आलेले आरोप प्रसारित करण्यात आले. कश्यप यांना विश्वास आहे की ही चुकीची तक्रार लवकरच उघडकीस येईल.’
दरम्यान, ‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले आहे. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत, असे ट्विट करत अनुराग कश्यपने पायलला उत्तर दिले होते.