-->

लस घेतल्यानंतर ऍन्टिबॉडिज तयार होण्यास लागतो पंधरवडा

  • या काळात करोनाची लागण शक्य : तज्ज्ञांचे मत
  • ससूनमध्ये लसीकरणानंतर दोघांना करोना संसर्ग

 

पुणे – करोना प्रतिबंधित लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर ऍन्टिबॉडिज तयार व्हायला 15 दिवस लागतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही करोनाची लागण होऊ शकते, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. ससून रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना लस घेऊनही करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.

 

 

ससूनमध्ये लस घेतल्यानंतर त्यातील एकाला चार तर दुसऱ्याला सात दिवसांनी करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लस घेतल्यानंतर लगेचा ऍन्टिबॉडिज तयार होत नाहीत, त्यामुळे लाभार्थींनी लगेचच बेफिकीर न होता, सुरक्षेचे सर्व नियम पाळलेच पाहिजेत असे ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.

 

 

दोघांना संसर्ग झाला असला तरी त्यांची तब्येत स्थिर आहे. लस घेतली तरी सर्वांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात वारंवार स्वच्छ करणे गरजेचे आहे.

 

 

ससून रुग्णालयात सध्या पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. सीरम इन्टिट्यूटची कोविशिल्ड ही लस सर्वांना देण्यात येत आहे. आतापर्यंत 2,297 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर करोना होणार नाही, असा दावा कोणीही केला नाही. पण, लसीमुळे करोना झाल्यानंतर हॉस्पिटलायझेशन होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. कोणतीही लस 100 टक्के सुरक्षा देऊ शकत नाही तर तिच्या क्षमतेनुसार रोगाच्या संसर्गाची तीव्रता कमी करते.

– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.