नवी दिल्ली : करोनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. तसेच झपाट्याने होत चाललेले खाजगीकरण या मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मित्र प्रवीण तोगडिया यांनी मोदींवर सडकून टीका केली. तसेच मोदी सरकारचे आर्थिक धोरण बिनकामाचे असल्याची टीका त्यांनी केली.
वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी तोगडिया बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नरेंद्र मोदी भेटत नसल्याची खंत व्यक्त केली.
त्यांना राममंदिरच्या सुरुवातीला बाबरी मस्जिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय झाला. ज्याने राम मंदिरसाठी जीवन भर लढा दिला, तो प्रवीण तोगडिया प्रिय झाला नाही. मेरे नरेंद्र भाई को बाबूओ ने बिगाड दिया, नरेंद्र भाई बहोत अच्छे है, असे तोडगिया म्हणाले.
नरेंद्र मोदी हे माझे मोठे भाऊ आहे. माझ्या गावातून भाजी येत होती आणि ती माझ्या घरी येऊन नरेंद्र मोदी खात होते. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीय. पण त्यांचं वागणं बदललंय असं सांगत दोस्त दोस्त ना रहा, अशा प्रकारची सध्या अवस्था झाल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं.
खाजगीकरणावरुन तोगडिया यांनी नरेंद्र मोदींना चांगलेच चिमटे काढले. देशात झपाट्याने होत चाललेले खाजगीकरण माझ्या समजण्यापलीकडचे असल्याचे सांगत नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये, असे तोगडिया म्हणाले.
भारताचा किंवा जगातला कोणताही व्यापारी फायद्यासाठी काम करतो यात दुमत नाही. पण हा नफा कोणाकडून कमावतो हा प्रश्न आहे. जेवढ्या सरकारी संस्था या खासगीकरणात जाणार तेवढे पाच टक्के जास्त पैसे जनतेला चुकवावे लागणार आहेत. रोड, रेल्वेस्टेशन, स्टेडियम हे खाजगी लोकांना देणं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या संस्था खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे असेच आहे, असे ते म्हणाले.
युरोपात सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथील परिस्थिती बिकट झाली आणि सरकारला सबसिडी दयावी लागली. भारताचं इकॉनॉमिकल मॉडेल बदलावे लागेल.. एक टक्का जीडीपी वाढल्यास एक कोटी रोजगार वाढला पाहिजे मात्र भारतात तसं होत नाही याला जॉबलेस ग्रोथ म्हणतात. जीडीपी वाढल्यास सरकारच उत्पन्न वाढतं, सध्या भारताचा इकॉनॉमिकेल मॉडेल हा जॉबलेस ग्रोथचा आहे, यात सरकारला कर मिळेल मात्र तुम्हाला रोजगार मिळणार नाही, असेही तोगडिया म्हणाले.