पुणे- नानासाहेब गायकवाडच्या घरझडतीमध्ये ईएसए मॉडेल, 200 एअर रायफल, 31 जिवंत काडतुसे असलेले 32 कॅलिबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशीन आणि संजीव मोरे व इतर 70 लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घरात मिळून आले आहे. तसेच पोलिसांना दोन पानी कागद मिळाला असून त्यावर
14 लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय 70), नंदा नानासाहेब गायकवाड (वय 65) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलीस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर ईलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडाछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाइल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाडच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे, अशी माहिती सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयास दिली. त्याच्या पत्नीने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्रे व इतर पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने इतर ठिकाणी हलवले आहेत.
नानासाहेब गायकवाड हे नेहमी रिव्हॉल्वर सोबत ठेवत. गणेश गायकवाड हा तो वापरत असेलेल मोबाइल मुंबई येथे विसरल्याचे चौकशीत सांगत आहे, अशा बाबी पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत. गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ऍड. फरगडे यांनी केली. मूळ फिर्यादीतर्फे ऍड. पुष्कर दुर्गे, ऍड. सचिन झालटे, ऍड. ऋषिकेश धुमाळ यांनी कामकाज पाहिले.