तामीळनाडूला आणखी एका वादळाचा धोका

चेन्नई – बंगालच्या उपसागरात सोमवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तामीळनाडूला आणखी एका वादळाच्या धोक्‍याला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

तामीळनाडूच्या काही भागांना अलिकडेच निवार वादळाचा तडाखा बसला. त्यापाठोपाठ त्या राज्याची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली. भारतीय हवामान खात्याने आणखी एक वादळ धडकण्याचा इशारा दिला आहे. त्या वादळामुळे 2 आणि 3 डिसेंबरला दक्षिण तामीळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संभाव्य वादळ 2 डिसेंबरच्या सायंकाळी किंवा रात्री श्रीलंकन किनारपट्टी ओलांडेल. त्यानंतर पुढील सकाळी ते तामीळनाडूत दाखल होण्याची शक्‍यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे तामीळनाडू, केरळबरोबरच पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश आणि लक्षद्विपमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याबरोबरच संबंधित राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील यंत्रणांना सज्ज राहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी निवारमुळे अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. त्या वादळाने मोठे नुकसान झाल्याची घडामोड ताजी असतानाच आणखी एका वादळाने धास्ती वाढवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.