- “मायक्रो झोन’ परिसर सील : एकाच कुटुंबातील सात जणांना बाधा
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूगावच्या हद्दीत रविवारी (दि. 14) दोन करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सतरा “हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी केली असता त्यामध्ये मंगळवारी (दि. 16) सहा जणांचे तपासणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याने देहूतील रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही घर समोरासमोर असल्याने “मायक्रो झोन’ परिसर सील करण्यात आला आहे.
तीर्थक्षेत्र देहू हद्दीत रविवारी आढळलेल्या दोन रुग्णांपैकी चव्हाणनगर येथील 75 वय वर्ष असणाऱ्या वयोवृद्धांच्या एकाच कुटुंबातील सहा जण तपासणी अहवालात करोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती मिळाल्याची वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.
करोना लागण झालेल्यांमध्ये दोन महिलांसह चार पुरुष असून, एक 68 वर्षीय वयोवृद्ध महिला आणि एक 17 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे कुटुंब समोरासमोर राहत असून, पुढील उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिसरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावे. आवश्यक कामाशिवाय विनाकारण फिरू नये, बाहेरून आलेल्या व्यक्तींची तसेच हातावर शिक्का असणारी व्यक्ती फिरताना आढळून आल्यास त्यांची माहिती कळवावे, असे आवाहनही वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
सहा जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, परिसरातील नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग, मधूमेह, दमा, रक्तदाब अशा गंभीर आजारी व्यक्तीचे तपासणी व माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.