नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना कर्नाटकच्या धारवाड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची पर्सनॅलिटी खराब असल्याचे कारण देत पक्षाने उमेदवार बदलावा अशी मागणी येथील लिंगायत समाजाने पक्षाकडे केली आहे. भाजपने अन्य कोणाला येथून तिकीट द्यावे यासाठी पक्षाला चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
धारवाडच्या जागेवर लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. उमेदवाराच्या विजयाचा फैसला हा सर्वस्वी लिंगायत समाजाच्या मतदारांच्याच हातात असतो. कर्नाटकात २६ एप्रिल आणि ७ मे अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
फक्किरेश्वर मठाचे पुजारी डिंगलेश्वर स्वामी म्हणाले की धारवाडच्या खासदाराच्या संदर्भात कर्नाटकातील संतांनी चर्चा केली. सर्वच मठांच्या पुजाऱ्यांनी खासदार बदलण्याची मागणी केली आहे. आम्ही ३१ मार्चपर्यंत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याची वाट पाहू. त्यानंतर २ एप्रिल रोजी आम्हीच आमचा निर्णय जाहीर करू. प्रत्येक समुदाय त्यांच्यावर नाखुष आहे.त्यामुळे आमचा निर्णय घेतला गेला आहे. आम्हाला आता २ एप्रिलपर्यंत वाट पाहायची आहे. आम्ही पक्ष नाही तर प्रल्हाद जोशी यांच्या बद्दल बोलत आहोत. डिंगलेश्वर स्वामी म्हणाले की बैठकीत असेही ठरले आहे की उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातही स्वामी मंडळी राजकारणात काम करू शकतात आणि निवडणूक लढवू शकतात.
धरवाडमध्ये लिंगायत समाज बहुसंख्यक आहे. जोशी हे ब्राह्मण समाजातील आहेत. संतांनी केलेल्या मागणीबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यावर जोशी म्हणाले की त्यांना डिंगलेश्वर स्वामी यांचा आदर आहे. संत आणि मठाशी माझे ३० वर्षांचे नाते आहे. स्वामी यांनी केलेली टिप्पणी मला आशीर्वाद आहे. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर येणाऱ्या काही दिवसांत त्यांना भेटून मी तो दूर करेन. तर भाजपचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते बी. एस. येडियूरप्पा यांनी जोशी यांच्या जागी अन्य कोणाला उमेदवारी देण्याची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की जोशी वरिष्ठ नेते आहेत आणि मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. लिंगायत समाजाच्या संतांशी आपण स्वत: चर्चा करून आणि त्यांचा गैरसमज दूर करू असेही येडियूरप्पा यांनी सांगितले.