पुणे – पुणे पोलीस दलाला करोनाने आणखी एक हादरा दिला आहे. करोनाची लागण झालेल्या 51 वर्षीय हवालदाराचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील हा पाचवा बळी आहे.
विनोद पोतदार (51) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोतदार हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना रक्तदाबाचा (बीपी) त्रास होता. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 20 पोलीस अधिकारी आणि 184 पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. करोनाची साथ आल्यापासून पोलीस हे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आघाडीवर राहून लढत आहेत. घराबाहेर पडावे लागत असल्याने पोलिसांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.
पोलिसांमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्येही करोनाची लागण होण्याची भीती असल्याने चिंता अधिक वाढली आहे. याच भीतीने अनेक पोलीस आपल्या कुटुंबियांपासून दूर राहात आहेत.