मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेसह कोरोना योद्धे म्हणून काम करणारे देखील येत आहेत. आता राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात अस्लम शेख यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
‘मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले आहे.
This is to inform that I’ve tested positive for #COVID19. I’m currently asymtomatic and isolating myself.
I request all those who have come in close contact with me to get themselves tested.
I will continue to work from home to serve the people of my state. 🙏🏻
— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) July 20, 2020
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी देखील स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. माझ्या पत्नीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून शनिवार, 18 जुलैला माझा स्वॅब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटुंबियांची काळजी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा, असे ट्वीट शंकरराव गडाख पाटील यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह त्यांचे सचिव, पीए आणि काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. ते देखील कोरोनावर मात करुन बाहेर आले.