सातारा – रहिमतपूर (ता. कोरेगाव) पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आनंद गजानन गोसावी (वय 48, रा. व्यंकटपुरा, सातारा) यांचा आज सकाळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना करोनामुळे मृत्यू झाला. करोना युद्धात धोका पत्करून सेवा बजावताना दुसऱ्या पोलीस हवालदार योद्ध्याचा मृत्यू झाला आहे.
आनंद गोसावी 1991 मध्ये सातारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाले. प्रथम सातारा शहर पोलीस ठाण्यात डिटेक्टिव्ह ब्रॅंचला काम केल्यानंतर कराड शहर, महाबळेश्वर, कोरेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. दोन वर्षांपासून ते रहिमतपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कामकाज पाहत होते.
दि. 21 रोजी आनंद गोसावी यांना धाप लागू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून काम करणारे त्यांचे बंधू अजय गोसावी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. 21 ते 24 जुलैदरम्यान त्यांच्यावर तेथील करोना सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ऍन्जिओग्राफी करण्यासाठी त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रजेवर असल्यामुळे त्यांचा रहिमतपूर पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क आला नव्हता.
त्यामुळे पोलीस ठाण्यातील इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले नसल्याची माहिती रहिमतपूर पोलिस ठाण्यातून देण्यात आली. आनंद गोसावी यांचा सातारा जिल्हा पोलीस दलात कबड्डीपटू म्हणून नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.