पुणे – महापालिकेच्या वाहन विभागाचे प्रमुख आणि परिमंडळ-2 चे उपायुक्त नितीन उदास यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांना लक्षणे दिसून आल्याने मंगळवारी त्यांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यात त्यांना बाधा झाल्याचे समोर आले.
उदास यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, पालिकेच्या बाधित कर्मचाऱ्यांचा आकडा 218 वर गेला आहे.
मागील आठवड्यात समाज विकास विभाग व मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत राजकीय पदाधिकाऱ्यांना बाधा होत असल्याचे समोर येत असतनाच, आता आणखी एका उपायुक्तांना बाधा झाल्याचे समोर आल्याने अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.