वाघोली – वाघोलीतील करोना रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून बुधवारी (दि. 8) दिवसभरात 18 करोनाचे विक्रमी रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. वाघोलीतील करोना रुग्णांचा एकूण आकडा 78 झाला आहे. यापैकी 24 रुग्ण बरे झाले आहेत तर 54 रुग्ण ऍक्टीव आहेत. दि. 15 एप्रिल रोजी वाघोलीत करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तर मागील नऊ दिवसामध्ये करोनाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊन 78 रुग्ण झाले आहेत.
एकाच दिवसात 18 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने वाघोलीकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, स्वच्छता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात वाघोलीत करोनाचे 18 रुग्ण सापडण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी लागला होता आता एका दिवसातच 18 करोनाचे रुग्ण सापडू लागले असल्याने करोनाचा सामाजिक संसर्ग कित्येक पटीने वाढला आहे.