मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, नवी मुंबईतील शिवसेनेच्या ३२ माजी नगरसेवकांनी गुरुवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
ठाणे,कल्याण-डोंबिवली व नवीमुंबई मनपातील बहुतांश आजी,माजी नगरसेवक तसेच शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांनी माझी भेट घेऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना समर्थन देत पाठिंबा दर्शवला#RealShivSena pic.twitter.com/hgmDBtBvrx
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. ही गळती सुरु असतानाच आता ठाण्यानंतर नवी मुंबईतील जवळपास ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतांना, नवी मुंबईचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी म्हणाले, “एकनाथ शिंदे जेव्हा गरज असेल तेव्हा आमच्या पाठीशी उभे राहिले.”
‘आम्ही त्याच्यासोबत असू. त्यांनी कधीही कोणाचा फोन नाकारला नाही. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याने त्यांना फोन केला तरी ते कॉल रिसिव्हकरतात. नेता असावा तर असा,” असेही सुरेश कुलकर्णी म्हणाले.
तसेच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ट्विट करत नगरसेवकांच्या पाठिंब्याबाबत माहिती दिली आहे, त्यांनी ट्विट केले आहे की,’ठाणे,कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई मनपातील बहुतांश आजी, माजी नगरसेवक तसेच शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांनी माझी भेट घेऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना समर्थन देत पाठिंबा दर्शवला’
दरम्यान, गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. बहुसंख्य आमदारांनी त्यांची बाजू घेतली, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले.