सातारा/कराड -सातारा जिल्ह्यातील कृष्णासह विविध हॉस्पिटल व करोना केअर सेंटरमधून 25 रुग्णांना सोमवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्तांची एकूण संख्या 533 झाली आहे, तर 180 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आज घरी सोडलेल्या रुग्णांमध्ये तुळसण (ता. कराड) येथील सहा जणांचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर एकूण 194 बाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले वडगाव (उंब्रज), ता. कराड येथील 49 वर्षांची महिला, तुळसण येथील 60, 50, 26 व 65 वर्षांच्या महिला, 26 व 30 वर्षांचे पुरुष, कोळकी (फलटण) येथील 45 वर्षांची महिला व 25 वर्षांचा युवक, पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले कावडी, ता. जावळी येथील 18 व 47 वर्षांचे पुरुष, 58 वर्षांची महिला व 15 वर्षांची मुलगी, फलटण करोना सेंटरमधील सस्तेवाडी, ता. फलटण येथील 38 व 25 वर्षांच्या महिला, जोरगाव येथील 21 वर्षांचा युवक, 12 वर्षांचा मुलगा, पाटण करोना सेंटरमधील आडदेव, ता. पाटण येथील 25 वर्षांचा तरुण, वाई करोना सेंटरमध्ये दाखल असलेल्या धावडी, ता. वाई येथील 48 व 19 वर्षांचे पुरुष, ब्रह्मपुरी करोना सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या पिंपोडे, ता. कोरेगाव येथील 53 वर्षांचा पुरुष, वाघोलीतील 53 वर्षांचा पुरुष व 68 वर्षांची महिला, मायणी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेले कलेढोण, ता. खटाव येथील 42 वर्षांचा पुरुष व 32 वर्षांची महिला, अशा एकूण 25 रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील एनसीसीएस यांच्याकडून काल (दि. 14) रात्री उशिरा 134 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 745 झाली असून 533 जणांनी करोनावर मात केली आहे. विविध रुग्णालयांमध्ये 180 करोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे.