बारामती तालुका झाला “करोनामुक्‍त’

बारामती (प्रतिनिधी) –शहर करोनामुक्‍त झाल्यावर तालुक्‍यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, आता तालुकाही करोनामुक्‍त झाला आहे. दरम्यान, शहरात 60 तर ग्रामीण भागात 14 दिवसांत एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. शहरासह तालुक्‍यात करोना संक्रमितांची संख्या शून्य झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

बारामती शहर कोरोनामुक्त झाल्यानंतर माळेगावात करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर ग्रामीण भागातील करोना संक्रमितांची संख्या वाढत गेली. त्यातील माळेगाव व कोऱ्हाळे बुद्रुक येथील करोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे-मुंबई येथून नागरिकांचे लोंढे बारामतीत दाखल झाले. त्यामुळे बारामतीच्या ग्रामीण भागात करोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत सर्वांनी खबरदारी घेतल्याने करोनाचा मोठा धोका सध्या तरी बारामतीच्या ग्रामीण भागात टळला आहे. कोऱ्हाळे बुद्रुक येथील तिघांवर रुई ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू होते. त्या तिघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी (दि. 15) घरी सोडण्यात आले, त्यामुळे बारामती शहर व तालुका करोनामुक्‍त झाला आहे. भिलवाडा तसेच बारामती पॅटर्नची प्रभावी अंमलबजावणी करून बारामती शहर करोनमुक्‍त करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागातदेखील करोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाने यश मिळवले आहे.

गर्दी टाळा
बारामती शहर व तालुका करोनामुक्‍त झाले असले तरीदेखील पुणे जिल्हा व शहरात करोनाबाधितांची संख्या आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बारामतीकरांना योग्य खबरदारी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन शिथील केले असले तरी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.