पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आणखी 14 करोना संशयित रुग्णांचे अहवाल मंगळवारी (दि. 26) पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये राजगुरूनगर, कुरकुंडी, वडगाव पाटोळे आदी भागातील सर्वाधिक 7 रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णालयातील करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला असून 106 रुग्णांपर्यंत जाऊन पोहचला आहे.
करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 14 रुग्णांमध्ये 10 वर्षीय मुलासह 7 पुरूष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील राजगुरूनगर – 3, कुरकुंडी – 3, वडगाव पाटोळे – 1 अशा 7 रुग्णांचा करोना बाधितांमध्ये समावेश आहे. त्याशिवाय, पुण्यातील भवानी पेठ आणि मंगळवारपेठ येथील 3 जणांना करोनाची लागण झाली आहे.
सांगवीतील 2 तर, बापलवाडी-चासकमान (ता. खेड) आणि दौंड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज रुग्णालयामध्ये नव्याने 19 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.