वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील ४ नंबर खाण परिसरामध्ये आरएमसी प्लांट जवळ असणाऱ्या लेबर कॅम्पमधील २० वर्षीय कामगार महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच महिला कुटुंबासह येथे वास्तव्यास आली होती. सदरची महिला गर्भवती होती. दोन दिवसापूर्वी तिला प्रसूतीसाठी वाघोली येथून ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने एका बाळाला जन्म दिला आहे. महिलेची व बाळाची कोरोना टेस्ट केली असता महिला पॉजिटीव्ह निघाली तर बाळ निगेटिव्ह आले आहे.
तिच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला वास्तव्यास असणाऱ्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली असून त्यांचा इतर लोकांशी फारसा संपर्क आलेला नाही. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण सापडले असून यापैकी ७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ६ अॅक्टीव रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.