करोनाचा बाजारपेठेवरील “इफेक्ट’ निवळला
पिंपरी – दिवाळीनिमित्त महिला वर्गाकडून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू झाली आहे. करोनाचा बाजारपेठेवर झालेला “इफेक्ट’ सध्या बऱ्यापैकी निवळला आहे. गंठन, हार, चोकर, बांगड्या, नेकलेस आदी दागिन्यांना महिला वर्गाकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त सोन्याला झळाळी आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
आठवडाभरापूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला 52 हजार 700 रुपयांपर्यंत होते. हे दर प्रति दहा ग्रॅमला दीड हजार रुपयांनी खाली आले आहे. सोन्याचा आजचा दर प्रति दहा ग्रॅमला 51 हजार 200 इतका होता. त्यामुळे महिला वर्गाकडून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढली आहे.
महिलांकडून टेंपल, ऍन्टीक, कुंदन ज्वेलरीला विशेष मागणी आहे. त्यातही सध्या गंठन, हार, चोकर, बांगड्या, नेकलेस आदी दागिन्यांची खरेदी केली जात आहे. करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिने सराफ बाजारावर मोठा परिणाम झाला. अधिक (अश्विन) महिन्यापासून सोन्याचे दागिने आणि चांदीतील वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. दसऱ्यानंतर आता दिवाळीतही महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद आहे.
चांदीच्या दरात वाढ
चांदीचे दर आज प्रति किलो 64 हजार 500 रुपये इतके होते. आठवडाभरापूर्वी चांदीचे दर प्रति किलोला 62 हजार रुपयांपर्यंत होते. त्यामध्ये सध्या प्रति किलो अडीच हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. दिवाळीसाठी चांदीतील गणपती, माता लक्ष्मी व अन्य भरीव मूर्त्यांना मागणी आहे. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे.