नवी दिल्ली : राजस्थानमध्ये परीक्षेतील कॉपी करण्याचा प्रकार रोखण्याच्या नावाखाली मुलींचे स्वेटर आणि ओढण्या काढायला सांगण्यात आल्या होत्या. तसेच हा सर्व प्रकार मोकळ्या जागेत घडला होता. दरम्यान, या प्रकरणाने आता राजकीय वळण आहे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी आलेल्या महिला उमेदवारांना केंद्राच्या गेटवर स्वेटर काढण्यास सांगण्यात आले होते.
नियमांचे पालन करण्यास सांगत प्रशासनाने केंद्रांवर फुल स्लीव्हचे कपडे काढायला लावले. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत उमेदवार परीक्षेला बसले. याप्रकरणी आता भाजपाने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते लक्ष्मीकांज भारद्वाज यांनी ट्विट करून राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारला कामचुकार म्हटले आहे.
लक्ष्मीकांज भारद्वाज यांनी लिहिले की, “कॉपी रोखण्यात अपयशी ठरलेले काँग्रेसचे राजस्थान सरकार अशा थंड वातावरणात परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या मुलींना स्वेटर, ओढणी, दुपट्टे काढायला लावत आहे.” ग्रामविकास अधिकारी पदाच्या थेट भरतीची प्राथमिक परीक्षा जिल्ह्यातील सहा केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. पहिल्या शिफ्टपेक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये जास्त विद्यार्थी दिसले. अनेक महिला उमेदवारांनी पेपर देण्यासाठी घाईघाईत स्वेटर काढले, मात्र अनेक मुलींसाठी हा प्रकार अस्वस्थ करणारा होता.
याबाबत महिला उमेदवारांनी सांगितले की, “सरकार जर कॉपी रोखण्यासाठी कडक नियम करत असेल तर महिला उमेदवारांना गैरसोय होऊ नये आणि त्यांची खुल्या जागेमध्ये त्यांना ओढणी, स्वेटर, दुपट्टा काढावा लागू नये, यासाठी केंद्रांवरही तशी व्यवस्था करावी. अन्यथा अशा प्रकारे महिलांचा अपमान करण्याचे हे प्रकार थांबले पाहिजेत.”
परीक्षेपूर्वी उमेदवारांना बूट काढायला लावण्यात आले. शहरातील सेठ नेतराम मगराज टिब्रेवाल शासकीय महिला महाविद्यालयात महिला उमेदवारांना परीक्षेला बसण्यापूर्वी दुपट्टा, स्वेटर बॅग, शूज, पर्स आदी साहित्य मुख्य गेटवर ठेवावे लागत होते. या संपूर्ण प्रकारावर सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे.